
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले आणि मुख्याधिकारी निखील जाधव उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. 1 मे : कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे (महाराष्ट्र दिन) औचित्य साधून आज फलटण शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या निमित्ताने फलटण नगरपरिषदेच्या प्रांगणात शहराचा मुख्य ध्वजारोहण सोहळा अत्यंत दिमाखात आणि राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला.
शहरातील या मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा मान फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाला. त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानाची मानवंदना दिली.
या महत्त्वपूर्ण आणि सन्माननीय सोहळ्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
तसेच या ध्वजारोहण कार्यक्रमास नगरपरिषदेचे विविध प्रभागांतील नगरसेवक, पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी आणि फलटण शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
