तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट


दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । मुंबई । तेलंगणा राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक बी. राजा मौली यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन महासंचालनालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.

तेलंगणा राज्याचे माहिती संचालक बी. राजा मौली यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास भेट दिली. पथकात सहसंचालक डी. एस. जगन, सहसंचालक डी. एस. श्रीनिवासन यांचा समावेश होता.

महासंचालक जयश्री भोज यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, उपसंचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.

सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांनी राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करीत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी लोकराज्यचे अंकही भेट दिले.

यावेळी शासकीय जाहिरात वितरण धोरण, शासकीय अभियानाच्या प्रसिद्धीसाठी समाज माध्यम आणि विविध नवीन माध्यमांचा वापर, प्रसार माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, प्रसार माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्री. राजामौली, श्री. जगन आणि श्रीनिवासन यांनी माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम प्रतिसाद केंद्र (एमआरसी) आणि स्टुडिओची पाहणी केली. तिथे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली.


Back to top button
Don`t copy text!