
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । फलटण । देशाचे पंतप्रधान ना। नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली प्रधानमंत्री आवास योजनेमधून कोणीही लाभार्थी वंचित राहू नये, याबाबत अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी केले.
फलटण येथील अधिकार गृह (प्रांत ऑफिस) येथे असणाऱ्या दरबार हॉल मध्ये आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख पोलीस प्रमुख समीर शेख, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
फलटण शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करून उद्दिष्टाच्या पुढे जाऊन सुद्धा कामकाज करावे. फलटण शहरामध्ये व उपनगरांमध्ये असणाऱ्या सदनिका धारकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळतो आहे, की नाही ? याची पडताळणी शासकीय अधिकाऱ्यांनी करावी असेही निर्देश यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी दिले.
फलटण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या ज्या योजना राबविल्या जातात त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री किसान योजना, केंद्र शासनाच्या सामाजिक दुर्बल घटकामधील योजना, अन्न सुरक्षा योजना, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना याची सविस्तर माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली.
फलटण येथील अधिकार गृह (प्रांत ऑफिस) येथे असणाऱ्या दरबार हॉल येथे एक सुसज्ज असा सर्व सोयीसिविधा असलेला मीटिंग हॉल तयार करावा. एवढा चांगला हॉल असताना त्याला चांगल्या सुविधा कराव्यात, असे निर्देश सुद्धा यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व प्रांताधिकारी डॉ. शिवजीराव जगताप यांना दिल्या.
फलटण येथे उपचारासाठी येत असलेल्या नागरिकांना सर्व सोयी सुविधांयुक्त असे असलेले उपजिल्हा रुग्णालयात सोयी मिळाव्यात त्यासोबतच उपचार घेतल्यानंतर प्रधानमंत्री जन औषधी केंद्रामधून त्यांना औषधे देण्यात यावीत, अशा सूचना यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्यंकट धवन यांना दिल्या.
कोरोना लसीकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस सुद्धा नागरिकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांनी दिल्या.