तरडगाव पालखी तळावर पाण्याचा निचरा होण्याची खबरदारी घ्या; मागील वर्षीची पुनरावृत्ती नको : योगी निरंजननाथ


दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। फलटण । फलटण तालुक्यातील पहिला मुक्काम असलेल्या तरडगाव पालखी तळावर मागील वर्षी पावसाने हजेरी लावली होती. पावसाने हजेरी लावल्यानंतर पालखीतळावर पाण्याचा निचरा न झाल्याने हजारो वारकऱ्यांची गैरसोय झालेली होती. तरी यावर्षी तरडगाव पालखी तळावर पाण्याचा निचरा होईल; याबाबत खबरदारी घ्यावी, मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ देऊ नये, अशा स्पष्ट सूचना श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थांनचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 27 जून रोजी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर तरडगाव पालखी तळाची पाहणी करताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त योगी निरंजनाथ बोलत होते.

यावेळी पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागारजन, उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तरडगाव पालखी तळावर प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. मागील वर्षीची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये; पाऊस येणार आहे हे गृहीत धरूनच यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी, असे निर्देश यावेळी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!