
स्थैर्य, गोखळी, दि. ०५ ऑगस्ट : बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचे मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील गोखळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रक्त घ्या, पण आमच्या मागण्या मान्य करा’ अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराद्वारे शासनाचे लक्ष वेधले.
हे शिबिर प्रहारचे कार्यकर्ते गणेश गावडे यांच्या मातोश्री, कै. संगिता रघुनाथ गावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि बारामती येथील अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाने एकूण ६४ रक्त बाटल्या संकलित केल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोखळी मठाचे मठाधिपती ओंकार गिरी गुरू इच्छागिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य समन्वयक गौरव जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये करण गावडे, ज्ञानेश्वर गावडे, शंतनू जाधव, सुरज गावडे, वैभव भोसले, दिलावर काझी यांचा समावेश होता. तसेच, पत्रकार राजेंद्र भागवत आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. सुजित गावडे यांनी, तर आभार प्रदर्शन राधेश्याम जाधव यांनी केले.