मनोज जरांगे पाटील ८ ऑगस्टला फलटण दौऱ्यावर; मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू

दौऱ्याच्या नियोजनासाठी बुधवारी महाराजा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन; मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंभूराज खलाटे यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑगस्ट : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंभूराज खलाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी फलटण शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता येथील महाराजा मंगल कार्यालयात एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व समन्वयक आणि समाजबांधव सहभागी होणार असून, जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची संपूर्ण रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.

शंभूराज खलाटे पुढे म्हणाले की, “फलटण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असल्याने या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचे नियोजन जिल्हास्तरावर भव्यदिव्य करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या बैठकीतच विविध समित्या स्थापन करून जबाबदारीचे वाटप केले जाईल.”

या दौऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने बुधवारी होणाऱ्या नियोजन बैठकीत उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!