
फलटण तालुक्यातील टाकळवाडी येथे जमिनीच्या वादातून एकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. संशयितांवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २६ जून : फलटण तालुक्यातील टाकळवाडी येथील चिंतामणी परिसरात रविवारी (२१ जून) दुपारी जमिनीच्या वादातून एकावर कुऱ्हाडीच्या तुंब्याने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्जुन नाझीरकर हे गंभीर जखमी झाले असून, दोन संशयितांवर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेत जमिनीच्या वादातून रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. अर्जुन नाझीरकर यांच्यावर संशयित संतोष नाझीरकर आणि तात्याराम नाझीरकर यांनी अचानक कुऱ्हाडीच्या तुंब्याने व लाकडी दांडक्याने हल्ला केला.
अचानक झालेल्या या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी अर्जुन नाझीरकर यांनी थेट पळ काढला आणि बाजूला असलेल्या ट्रॅक्टरखाली लपून आपला जीव वाचवला, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास बीट अंमलदार सागर अभंग हे करत आहेत.
