तडीपार गुंड मोन्या निंभोरे यास पाठलाग करून पकडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ मे २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मोन्या उर्फ राकेश रमेश निंभोरे (वय २८, रा. सात सर्कल, ता. फलटण) याच्यावर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे अनेक गुन्हे असल्याने व तो खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आल्याने त्याची साखरवाडी भागामध्ये दहशत आहे. साखरवाडी पंचक्रोशीतील गावांमध्ये लोक त्याला घाबरतात. त्यामुळे त्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी एक महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी, फलटण यांच्या आदेशान्वये सहा महिन्यांकरीता पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

लोकसभा निवडणूक असल्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलिस हवालदार योगेश रणपिसे, अमोल जगदाळे व बंदोबस्तासाठी आलेले प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपाई अश्विनी बागडे, भाग्यश्री पाटील हे साखरवाडी भागात गस्त करत असताना, सोमवार, ६ मे रोजी तडीपार मोन्या निंभोरे व त्याचा साथीदार दत्ता सुरेश मोरे उर्फ दत्ता पावले (राहणार सात सर्कल) हे मोटरसायकलवरून जिंती होळ मार्गाने जाताना संध्याकाळी ६.०० वाजता त्यांना दिसले.

सदरचा गुंड तडीपार असल्याने त्याला थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला असता, त्याने पोलिसांच्या गाडीवर लाथ मारली. पोलिसांना अपशब्द वापरून पळू लागले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याना पकडले. त्यावेळी त्या ठिकाणावरून दत्ता पावले पळून गेला. सदर ठिकाणावरून पोलिसांनी ते चालवत असलेली मोटरसायकल क्रमांक एमएच-११-एएस-२७११) ही पण जप्त केली.

मोन्या निंभोरे याला पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांवर भादवि कलम ३५३, ३४ सह तडीपारी आदेश भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

निवडणूक काळात सर्व तडीपार लोकांची यादी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे. हे तडीपार लोक मिळाल्यास त्यांना अटक करण्यात येणार आहे. जनतेने न घाबरता माहिती द्यावी, असे आवाहन फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!