
थेट WhatsApp वर मिळवा
शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाबद्दल ‘स्वराज ग्रीन पॉवर लिमिटेड’ला सलग दुसऱ्या वर्षी मानाचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 16 ऑक्टोबर : शाश्वत इथेनॉल उत्पादन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानातील अमूल्य योगदानाबद्दल ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’ला प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. ‘पर्यावरण संरक्षण आणि कार्यक्षम औद्योगिक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा सर्वोत्कृष्ट साखर इथेनॉल उत्पादक’ या विशेष श्रेणीत सलग दुसऱ्या वर्षी या राष्ट्रीय पुरस्कारावर कंपनीने आपले नाव कोरून औद्योगिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.
नवी दिल्ली येथे १४ ऑक्टोबर रोजी आयोजित भव्य सोहळ्यात भारत सरकारचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’च्या वतीने कंपनीच्या संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि डिस्टिलरी विभागाचे महाव्यवस्थापक श्री. संजय पवार यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास ऊर्जा क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
कंपनीचे प्रवर्तक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भक्कम मार्गदर्शनाखाली ‘स्वराज’ने हरित ऊर्जा आणि शाश्वत औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. कंपनीच्या एकात्मिक साखर, इथेनॉल आणि सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबतच सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि संसाधनांच्या पुनर्वापराला विशेष प्राधान्य दिले जाते. पर्यावरणावरील प्रतिकूल परिणाम कमी करून शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करण्यावर कंपनीचा भर आहे.
देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळ आणि भविष्यातील ‘सीबीजी’ (CBG) प्रकल्प
केंद्र सरकारच्या ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’ (EBP) कार्यक्रमाला स्वराज कंपनीच्या उत्पादनातून मोठा हातभार लागत आहे. आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करून देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याचे काम कंपनी करत आहे. भविष्यात इथेनॉल क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासोबतच अत्याधुनिक ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (CBG) प्रकल्प आणि पुढील पिढीतील हरित तंत्रज्ञानाच्या विकासावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
ऊर्जा क्षेत्रातील या योगदानाबरोबरच शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि स्थानिक समुदायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘स्वराज’ कटिबद्ध आहे.
सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे कंपनीच्या पर्यावरणपूरक धोरणांना आणि कार्याला राष्ट्रीय स्तरावर मोठी पोचपावती मिळाली असून, स्वराज परिवारामध्ये आणि संपूर्ण फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.





