दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२३ । मुंबई । सुषमा अंधारेंवर काल बीडमध्ये जे झाले त्याचे आम्ही समर्थन करत नाही. महिलेचा सन्मान राखला पाहिजे. वाकड्या नजरेनेच नाही तर हातही लावायची हिंमत होता नये. परंतू, त्यांच्यावर बीडच्या जिल्हाप्रमुखाने केलेले आरोपही महत्वाचे आहेत. नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाही असेच आरोप केलेले होते. उद्धव ठाकरे शिवसेनेतील पदे विकत आहेत. वारंवार असे आरोप होत गेले. आजही होत आहेत, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
यात सुषमा अंधारेंची काही चूक नाही. सुषमा यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीय. कारण जसा पक्ष प्रमुख तसे कार्यकर्ते. त्यांनी जे केले ते कार्यकर्त्यांनी आत्मसात केले आणि जगतायत. स्वत:चा एक रुपयाचा इन्कम नसला तरी जे अलिशान आयुष्य जगतायत ते कोणामुळे? मातोश्री २ वर एसी कोणामुळे लागले आहेत. व्हिडीओकॉनचे मालक कोणाकडून खासदार होते. यांची लाँड्री एका ठिकाणीच धुवायला जाते, कारण कामगार सेनेची सत्ता आहे. गाड्यांचा मेन्टेनन्स पटेल नावाचा व्यक्ती करतो. परदेश दौरे असतात त्यांचा खर्च कोण करतो? एक उद्योगपती त्यांच्या हॉटेल, जेवणाचे खर्च करतो. त्याच्या बिलासह आम्ही पुरावे देऊ शकतो. असा पक्ष प्रमुख जर असेल तर पदाधिकाऱ्यांनी कशाला एसी आणि सोफ्यासाठी खिशातून पैसे काढायचे, असा आरोप राणे यांनी केला.
सामनाचा साधा संपादक विमानाशिवाय फिरत नाही. बाहेरच्या संपत्ती, अलिशान गाड्या कुठून घेतल्या. राऊत यांचा आणि मालकाचा एक रुपयाचा इन्कम नाही. त्र्यंबकेश्वरमधील हिंदू बांधवांना खंडणीखोर म्हणतात. फडणवीसांनी वाझेचा किस्सा काल सांगितला. वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी दबाव होता. कारण त्याला यांच्या खर्चाचे टार्गेट दिलेले होते. तुमची सगळी अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत, असा इशारा देखील राणे यांनी दिला.
आता ते जे अंगावर परफ्यूम मारतात, त्यांची एअरपोर्टवर संघटना आहे तिथल्या ड्युटी फ्रीमधून बॉक्स येतात. माझ्यापेक्षा यावर किरण पावस्कर जास्त सांगू शकतील. कर भरण्यासाठी कोणता असा व्यवसाय करता. गेली २५-३० वर्षे मुंबई पालिकेला लुटली आहे. आदित्य ठाकरे राज्यपालांना भेटून भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करतायत. ते ज्या गाडीतून फिरतात ती गाडीतरी त्यांच्या नावावर आहे का? मराठवाड्याच्या कोणत्या आमदाराच्या नावावर गाडी आहे, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.