जिल्ह्यात मध उद्योग विकासासाठी मोठा वाव – रवींद्र साठे


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२३ । सातारा । जिल्ह्यात मध उद्योगास मोठा वाव असून मधाच्या गावांची संख्या आणखी वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. 

             महाबळेश्वर येथील मध संचालनालय येथे जागतिक मधमाशी दिवस  साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास वाई, महाबळेश्वर, खंडाळाचे आमदार मकरंद पाटील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, वाई प्रातांधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, कृषि सह संचालक बसवराज बिराजदार, अर्थ सल्लागार विद्यासागर हिरमुखे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह राज्यातील मध व्यवसायिक उपस्थित होते.

             मधाचे गाव ही संकल्पना राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. साठे म्हणाले, राज्य शासनाने मध उद्योगाच्या विकासासाठी सूमारे १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार राज्यभर मध योजना  राबविण्यात येणार आहे.

             आमदार श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून मोठी जैव विविधता लाभलेली आहे.  जिल्ह्यात वर्षाला 50 हजार किलो मधाचे संकलन होते.  भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

             मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिन्हा म्हणाल्या, मधमाशा पालन योजनेत मधपाळ, 50 टक्के स्वगुंतवणूक व 50 टक्के शासन अनुदान याप्रमाणे राबविण्यात येते.

             जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, कोयना व कांदाटी खोरे व पाटणसह  संपूर्ण जंगल भागातील गावे व कृषि क्षेत्रात मध उद्योगाचे जाळे निर्माण करावे.  यासाठी मंडळास शासनातर्फे सर्व ते सहकार्य करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!