स्थैर्य, मुंबई, दि. ४: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केले आहे. मानशिंदे यांनी यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्तचा यांचा खटला लढला आहे. प्रति हिअरिंग त्यांची फी 10 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. असातच एवढ्या महागड्या वकिलांना देण्यासाठी रिया चक्रवर्ती पैसे कुठून आणतेय, हा प्रश्न उपस्थित केला जातोय.
आता सतीश मानशिंदे यांनी स्वत: एका मीडिया हाऊसशी त्यांच्या फीसंदर्भात चर्चा केली आहे. झूम टीव्हीशी बोलताना सतीश मानशिंदे म्हणाले, ‘दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे माझ्या फीचा अंदाज 10 लाख रुपये लावला जातोय.. परंतु आपण 10 वर्षे जुना लेख का पाहात आहात? तसं पाहता, मग माझी सध्याची फी खूप जास्त असेल.’
ते पुढे म्हणाले, ‘माझ्या क्लायंटकडून मी जी काही फी घेतो त्याच्याशी कुणाचाही काहीही संबंध नाही. जर इनकम टॅक्सला माझी पी जाणून घ्यायची असेल, तर मी त्यांना उत्तर देईल. माझ्या आणि माझ्या क्लायंटमधील खूप वैयक्तिक असलेली कोणतीही चर्चा मला नको आहे.’
सुशांतच्या बहिणीने उपस्थित केला होता प्रश्न
श्वेताने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीची रियाची एक क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली होती, ज्यामध्ये रिया मुंबईतील आपल्या एका फ्लॅटचा ईएमआय कसा भरणार? याची चिंता व्यक्त करताना दिसली होती.
रिया क्लिपमध्ये म्हणाली होती, ‘मी खार (मुंबईचा एक परिसर) मध्ये जी प्रॉपर्टी विकत घेतली होती त्याची किंमत 72 लाख रुपये आहे. यासाठी मी एचडीएफसी बँकेतून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. मी अजूनही हे कर्ज फेडत आहे. परंतु, सध्या या घरासंबंधित सगळी कागदपत्रे ईडीकडे आहेत. माझे पूर्ण आयुष्य उद्धवस्त झाले आहे. अशा परिस्थितीत मी महिन्याला 17 हजारांचा इएमआय कसा काय देऊ’, असे रिया म्हणाली होती.
रियाच्या या वक्तव्यावर श्वेताने प्रश्न उपस्थित केला होता. ही क्लिप शेअर करुन श्वेताने तिला प्रश्न विचारला होता की, ”17 हजारांचा ईएमआय कसा देणार याची तुला चिंता आहे? मग प्लीज मला एक गोष्ट सांग देशातल्या सगळ्यात महागड्या वकिलांची फी तू कशी देतेय?” #RiaTheLiar असा हॅशटॅगही श्वेताने दिला होता.
मानशिंदे यांनी सलमान आणि संजय दत्त यांचा खटला लढला होता
काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान आणि 1993 मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तचा खटला सतीश मानशिंदे यांनी लढला होता आणि त्यांना जामीन मिळवून देण्यात त्यांना यश आले होते. त्यांची फी कोटींमध्ये आहे.