लॉकडाऊनमध्ये सायकल सुसाट, जुलैपर्यंत 34 लाखांची विक्री; जिम आणि हेल्थ क्लब बंद असल्याने सायकलच्या मागणीत वाढ


 

स्थैर्य, सातारा, दि.४: कोरोना काळात सायकल उद्योगाला चांगली दिवस आले आहेत. लॉकडाऊनदरम्यान मेपासून जुलैपर्यंत जवळपास ३४ लाख सायकली विकल्या आहेत. म्हणजे रोज सुमारे ३७ हजार सायकलींची विक्री झाली. सायकल निर्मात्यांनुसार, जिम आणि हेल्थ क्लब बंद असल्याने सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. स्पोर्ट्‌स, गिअर्ड बाइक्स, किड्स व फॅन्सी बाइक्सच्या मागणीत विशेष वाढ दिसली. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सायकल उत्पादक देश आहे. भारतात दरवर्षी २.२० कोटी सायकलींचे उत्पादन होते. संपूर्ण देशात सायकल उद्योगाशी संबंधित जवळपास ४ हजार युनिट्स आहेत. यातून जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोक जोडले आहेत. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक व युनिट्स लुधियानात आहेत. ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. के.बी. ठाकूर म्हणाले, ५८ वर्षांत मी आतापर्यंतच्या आयुष्यात सायकलच्या मागणीत एवढी तेजी पाहिली नाही. कोरोना काळात सरकारी ऑर्डर बंद असतानाही ही तेजी आहे. जवळपास २५ टक्के विक्री विविध राज्यांच्या सरकारी खरेदीवर अवलंबून असते. महामारीचे संकट संपल्यानंतरही मागणीही सुरू होईल. उद्योग जगतातील जाणकारांनुसार, भारतीय सायकल उद्योग सध्या ५-६ टक्क्यांनी वाढत आहे. मात्र, मागणीत मोठ्या प्रमाणात तेजी आल्याने उद्योगांत २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. सायकलच्या प्रथम वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे.

उद्योगासाठी सुवर्णकाळ

सायकल उद्योगासाठी हा सुवर्ण काळ आहे. मागणीबाबत बोलायचे झाल्यास आमच्या २.५ लाख सायकलींची ऑर्डर प्रलंबित आहे. मे महिन्यापासून उद्योग पुन्हा सुरू झाला होता. आम्ही एकटे दरमहा ४ लाखांहून जास्त सायकली तयार करतो. यामध्ये अन्य देशांना होणाऱ्या निर्यातीची संख्या नाही. आगामी महिन्यांत उत्पादन आणखी वाढवू. – पंकज मुंजाल, सीएमडी, हीरो सायकल्स

दुप्पट झाली मागणी

१५ मेपासून सायकलची मागणी दुप्पट झाली. १५-१५ दिवसांची वेटिंग आहे. सामान्य स्थितीत सरकारी ऑर्डरही मिळतील. – ओंकारसिंह पाहवा, एमडी, एवन सायकल्स

चीनचे अवलंबित्व संपवणे आव्हान

चीनवरील अवलंबित्व सर्वात मोठे आव्हान, मात्र चीनवरील अवलंबित्व उद्योगातील तेजी कायम राखणे, मागणी वेळेवर पूर्ण करण्यात भारतीय सायकल उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे. आकडेवारीनुसार, भारत चीनकडून वार्षिक ५४१ कोटी रुपयांच्या सायकलच्या सुट्या भागांची आयात करतो. उद्योगाला लागणाऱ्या १०० सुट्या भागांपैकी १५ आयात कराव्या लागतात. याच पद्धतीने दरमहा ८ ते १० लाख प्रीमियम सायकलही आयात केल्या जातात.

14 कोटी सायकलींचे वार्षिक उत्पादन जगभरात होते.

09 कोटी सायकलींचे वार्षिक उत्पादन एकट्या चीनमध्ये होते.

2.2 कोटी सायकली दरवर्षी भारतात तयार होतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!