दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांच्या प्रेरणेतून गुणवरे ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे सूर्यनमस्कार सप्ताह निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा व स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन (कथाकथन स्पर्धा) उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी 12 स्टेप सह सूर्य नमस्कार करीत आनंदाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तसेच कथाकथन स्पर्धेमध्ये आपल्या कथा फक्त इंग्रजी भाषेतून सादर केल्या. हावभावा सह सादर केलेल्या या कथा व सूर्यनमस्कार स्पर्धा पालकांनाही पाहता याव्यात यासाठी शाळेच्या वतीने झूम ॲपच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. स्वतः संस्थेच्या सचिव साधनाताई गावडे, अध्यक्ष ईश्वर गावडे यांनी झूम ॲप द्वारे सूर्यनमस्कार स्पर्धा व स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचा आनंद घेतला व आमच्या शाळेतील मुले भविष्यात उत्कृष्ट कथाकथनकार बनतील व सूर्यनमस्कारामुळे मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेचे प्राचार्य श्री गिरिधर गावडे यांनी आपल्या मनोगतात सूर्यनमस्कार सप्ताहामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक दररोज सूर्य नमस्काराचे नियमित सराव करत होते व सूर्यनमस्कारामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल तसेच विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास, नेतृत्व, धाडस, इत्यादी गुण येण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून देते व विद्यार्थी ही मिळालेल्या संधीचे सोने करतात त्याचप्रमाणे पालक ही विद्यार्थ्यांना मदत करतात म्हणून सर्व पालकांचे अभिनंदन व आभार मानले. शाळेने केलेल्या या उपक्रमाचे सर्व पालकांनी कौतुक केले. या स्पर्धेतून प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांक विजेते घोषित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोशी मॅडम व सस्ते सर यांनी केले तर आभार मोरे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.