
थेट WhatsApp वर मिळवा
एल निनोमुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊन ऊस उत्पादनात १५ ते ५० टक्के घट होण्याचा धोका आहे. पाण्याचे नियोजन आणि पाचट व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
स्थैर्य, सातारा, दि. 19 : एल निनोमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीत ऊस उत्पादनात १५ ते ५० टक्के संभाव्य घट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन व शास्त्रोक्त पाचट व्यवस्थापन करावे, असे आवाहन सातारा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी केले आहे.
पाचट आच्छादन आणि कुजविण्याची पद्धत
ऊस तोडणीनंतर खोडवा ठेवायचा असल्यास शेतातील पाचट जाळू नये किंवा बाहेर काढू नये. ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी मशीनने पाचटाचे बारीक तुकडे करून ते शेतात एकसारखे पसरावेत.
पाचट लवकर कुजण्यासाठी प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन ओलासर मातीत मिसळून पाचटावर पसरावे. यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहतो, गांडुळांची संख्या वाढते आणि तणांचा प्रादुर्भाव घटतो.
खोडवा आणि पाणी व्यवस्थापन
ऊस तोडणीनंतर उरलेले बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत, जेणेकरून जमिनीखालील कोंब जोमदार फुटतात. छाटणीनंतर लगेचच ०.१ टक्के कार्बेन्डॅझीम (१० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून) या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
ऊस पिकासाठी शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा किंवा पाचट आच्छादनासह ‘सरी आड सरीतून’ पाणी द्यावे. या उपायांमुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात खोडव्याचे अधिक उत्पादन घेऊन जमिनीची सुपीकता टिकवता येते.





