वीर सावरकर स्वीमर्स लबच्या वरदा कुलकर्णीचे जलतरण, नृत्य व चित्रकला स्पर्धांमध्ये यश

अपंगत्वाचा बाऊ न करता यशामध्ये सातत्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२३ | बारामती |
वीर सावरकर स्वीमर्स क्लबची अपंग जलतरणपटू वरदा कुलकर्णीने राज्य पातळीवर जलतरण स्पर्धेत यश मिळवताना नृत्य व चित्रकला स्पर्धांमध्येही यश मिळवले आहे.

बारामती येथील वरदा कुलकर्णी या विद्यार्थिनीने आपल्या शारीरिक आणि बौद्धिक दुर्बलतेवर मात करत राज्य पातळीवरील जलतरण, नृत्य, चित्रकला स्पर्धांमध्ये यश मिळवत बारामतीचे नाव चमकवले आहे. यासाठी वरदाला तिच्या आई-वडिलांकडून भक्कम पाठिंबा मिळत आहे.

वरदा ‘इंटेलिजन्स डिसअ‍ॅबिलिटी’ या आजाराने त्रस्त आहे. स्वतःच्या शारीरिक आणि बौद्धिक समस्यांवर मात करून जलतरण स्पर्धेमध्ये बारामतीचे नाव राज्य पातळी चमकविले आहे. वरदा बारामती येथील बालकल्याण केंद्र शाळेची विद्यार्थिनी आहे. वरदाने ३ डिसेंबर २०२२ मध्ये बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या स्पर्धेत १७ ते २१ या वयोगटात राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता. जलतरणासोबतच नृत्य, चित्रकला क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. तिने नृत्यामध्ये अनेक कार्यक्रमात सादरीकरण केले आहे. बारामतीत गणेश फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी तिचे सादरीकरण होत असते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयोजित दिव्यांग मुला-मुर्लीच्या स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम, जिल्हा परिषद पुणे व समाज कल्याण विभाग आयोजित २०१९ मधील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम, प्यारा ऑलिंपिक असोसिएशन आयोजित ऑक्टोबर २०२३ च्या स्पर्धेमध्ये रजतपदक, कारगिल दिनानिमित्त आयोजित जलतरण स्पर्धा २०२३ मध्ये खुल्या गटात प्रथम, राष्ट्रीय स्वयं संघ बारामती यांच्यातर्फे नवदुर्गा पुरस्कार, सकाळ चित्रकला स्पर्धेमध्ये दिव्यांग गटातून बारामती विभागात पहिली, जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत ब्राँझ पदक आदी स्पर्धांमध्ये यश मिळवत असताना शिक्षण व जलतरण स्पर्धेमध्ये तिने खास यश मिळवले आहे. तिन्ही ऋतूंमध्ये रोज दोन तास पोहण्याचा सराव वरदा करीत असते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांनी वरदा हिचा सन्मान केला आहे.

आई-वडील म्हणून आपण आपल्या मुलाची सद्यःस्थिती स्वीकारली पाहिजे. मुलाच्या आवडीनुसार त्याच्या कलानुसार त्याच्यातील सुप्त गुणांना वाव दिल्यास बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणारी मुलेदेखील आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. आम्ही दोघेही वरदाला विविध स्पर्धांसाठी घेऊन जात असतो. त्यामुळे साहजिकच आपल्यासोबत आपले कुटुंबीय आहेत, ही भावना तिला अशा स्पर्धांसाठी बळ देणारी ठरते. नेमके हेच या मुलांना गरजेचे आहे. वरदाने विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले यश हे तिच्या कष्टाचे चीज करणारे आहे. यावेळी तिच्या चेहर्‍यावरील आनंद सुखावणारा असतो.

– अनघा कुलकर्णी व संतोष कुलकर्णी, वरदाचे आई-वडील


Back to top button
Don`t copy text!