जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी बाबतचे ग्रामपंचायतकडून लेखी आश्वासन स्वीकारताना राहुल खराडे, सुशांत खराडे व ग्रामस्थ |
स्थैर्य, खटाव, दि. १४ : गोपूज ता. खटाव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल खराडे यांनी गोपूज ग्रामस्थांचा कायमस्वरूपी नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा व हा प्रश्न सार्वजनिक चर्चेला यावा व याची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी या हेतूने शनिवार दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार होते. या आंदोलनास गोपूज ग्रामस्थांसह नेहरू युवा मंडळ गोपूज, जनमित्र सामाजिक विकास संस्था सातारा, प्रेरणा सोशल डेव्हलपमेंट व रिसर्च संस्था सातारा, साद सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्था सातारा या सामाजिक संस्थांनी आंदोलनास पाठींबा दिला होता. मात्र दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी गोपूज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राहुल खराडे व सहकाऱ्यांच्यासोबत ग्रामपंचायत गोपूजचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये शनिवार दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करण्यात येणाऱ्या निषेध धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये गोपूज ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोपूज ग्रामस्थांच्या नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगून आजच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या कालावधीत “जलशुद्धीकरण प्रकल्प’ उभा करून ग्रामस्थांना नियमित शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याबाबतचे लेखी आश्वासन आजच्या बैठकीमध्ये राहुल खराडे व त्यांच्या सहकाऱ्यांना ग्रामपंचायतीने दिल्याने दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल खराडे यांचे नियोजित निषेध धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस पं. स. खटावचे ग्राम विस्तार अधिकारी नंदकिशोर माने, ग्रामविकास अधिकारी सुनील राजगुरु, माजी सरपंच बाबासाहेब घार्गे, माजी उपसरपंच संभाजी घार्गे, माजी उपसरपंच दत्तूकाका घार्गे, नितीन घार्गे, महादेव जाधव, विनोद खराडे, सुशांत खराडे, वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण घार्गे, व्हा. चेअरमन विजय खराडे, धनाजी घार्गे, बाळासो चव्हाण, संतोष चव्हाण विठ्ठल पडळकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ हजर होते.