वीर धरणातून नीरा उजवा कालव्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची उपविभागीय अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२४ | फलटण |
वीर धरण, वाठार वसाहत येथील धरणातून नीरा उजवा कालव्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी पत्राद्वारे साताराचे जिल्हाधिकारी डुडी यांच्याकडे केली आहे.

पत्रात उपविभागीय अधिकार्‍यांनी म्हटले आहे की, फलटण तालुक्यामध्ये सध्या मोठया प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सद्य:परिस्थितीत तालुक्यामध्ये ८८ गावे टंचाई म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ४१ गावांमध्ये १०६ वाडया / वस्त्यांसाठी ३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सदर गावांसाठी नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असलेल्या फलटण नगरपरिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरून व सुरवडी, ता. फलटण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या असलेल्या फिडींग पाँईटवरून पाणीटँकर भरणे सुरू आहे. तसेच फलटण तालुक्यातील ५५ गावांची नळपाणी पुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहे.

फलटण तालुक्याची एकूण लोकसंख्या ३,६७,७५९ इतकी असून लहान / मोठया जनावरांची एकूण संख्या १,३८,९१४ इतकी आहे. सध्या टंचाई परिस्थिती असल्याने फलटण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या मागणीचा विचार करता, फलटण नगरपरिषदेच्या टँकरमध्ये दि. १० जून २०२४ पर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याबाबत मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद, फलटण यांनी लेखी या कार्यालयास सांगितले आहे.

एकंदरीतच फलटण तालुक्याला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याकामी नीरा उजवा कालव्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वीर धरणामधून नीरा उजवा कालव्यामधून पिण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती आहे.


Back to top button
Don`t copy text!