शालेय वयातच विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी – डॉ. जयंत खंदारे

‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’साठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२३ | सातारा |
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करत सर्व भारतीयांची शान वाढवली आहे. अशा संशोधन मोहिमा भविष्यात यशस्वी होण्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी. ’नासा’ प्रशिक्षण कार्यक्रमातून नव्या पिढीतील अनेक संशोधक तयार होतील, असे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), तसेच सिंगापूर सायन्स सेंटर येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या २३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. खंदारे बोलत होते. स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने इयत्ता ६ वी ते १० वी च्या मुलांसाठी नुकतीच ही परीक्षा घेण्यात आली होती. यातील ११ विद्यार्थी ‘नासा’, तर १२ विद्यार्थी सिंगापूरला जाणार आहेत.

कोथरूड येथील भारती विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कस्टमचे आयुक्त राजेश डाबरे, आयएएस प्रेरणा देशभ्रतार, डॉ. पल्लवी दराडे, युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार, स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.

‘नासा’साठी अथर्व हेमंत राणे (सिंधुदुर्ग), आयुष गोविंद चव्हाण (नांदेड), वैष्णवी बापूराव खोमणे (बारामती), तेजश्री चौधरी (परभणी), तन्मय संतोष कोरडे (सातारा), सुमेध सागर देशपांडे (रायगड), शौर्य वैभव गडकरी व अनुज सचिनकुमार तांबे (पुणे), अनुज संदेश साळवी (रत्नागिरी), पार्थ नागनाथ थिटे (मुंबई) आणि रीतिशा सुशीलकुमार सावळे (हिंगोली) यांची, तर सिंगापूरसाठी सुयोग सुधीर अमृतकर (जळगाव), शुभम सचिन उबाळे (पैठण), समीक्षा प्रवीण अगंबारे (लातूर), अथर्व सुनील गिरी (अमरावती), संस्कृती सोमनाथ अंबाले (चाकण), मरियम ओमर मोमीन (पुणे), आर्या मुगुटराव ढाणे (रत्नागिरी), अनुष्का उमेश बारकूल (उस्मानाबाद), अनुष्का अशोक अकोलकर (अहमदनगर), आकांक्षा योगेश निकोडे (गडचिरोली), अजिंक्य केरसिंग विक्रम (बीड), अदिती विकास डांगे (सोलापूर) यांची निवड झाली आहे.

राजेंद्र निंभोरकर यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले. डॉ. पल्लवी दराडे, प्रेरणा देशभ्रतार यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्वतःच्या व देशाच्या प्रगतीमध्ये संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

सुदेष्णा परमार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. शशिकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आयेशा सय्यद यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!