दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभागीय युवा महोत्सव, राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, राष्ट्रीय युवा महोत्सव, आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव यामध्ये सहभागी होऊन प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्र. कुलगुरू मा.डॉ. पी. एस. पाटील तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड उपस्थित होते.
मुधोजी महाविद्यालयातील विद्यार्थी ओम पोपट शिंदे, ओंकार राजेंद्र दाणे यांनी राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव, तसेच लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व केले, तर राधा संतोष गायकवाड, विजय बबन शिरसागर, जान्हवी गोपी जाधव या विद्यार्थी कलावंतांनी राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवासाठी प्रतिनिधित्व केले. या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. टी. पी. शिंदे सर यांनी आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी संघ व्यवस्थापक म्हणून शिवाजी विद्यापीठाकडून काम पाहिले. त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील या गुणी विद्यार्थी कलावंतांच्या विशेष कामगिरीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे यांनी अभिनंदन केले आहे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर, उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित सर, वाणिज्य आणि कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. एल. सी. वेळेकर तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.