दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील जनतेला सात पिढ्यांना पुरेल इतकी ‘इस्टेट’ देणार असल्याची ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
आज फलटण तालुक्यातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरूवात ढवळ गावातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य व लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे-पाटील, मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, शरद नाना सस्ते, सरचिटणीस संतोष सावंत, माजी सरपंच विष्णूपंत लोखंडे, लतीफ तांबोळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभेचा खासदार झाल्यानंतर तालुक्यातील जनतेने दिलेल्या मतांचे ऋण फेडण्यासाठी खासदार झाल्यापासून या तालुक्यातील जनतेसाठी नीरा-देवघरचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी संघर्ष करीत आहे. धोम-बलकवडीचे पाणी चारमाही होते, ते बारमाही करण्यासाठी प्रयत्न केला. फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. फलटण-बारामती रेल्वेचे काम सुरू झालेले आहे. या तालुक्यामध्ये युवकांच्या हाताला काम देण्यासाठी नवीन एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे.
फलटण-आळंदी रस्ता, फलटण-सातारा रस्ता, फलटण-बारामती रस्ता, फलटण-शिंगणापूर, फलटण-दहिवडी रस्ता यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. फलटण शहरासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. फलटण येथे सेशन कोर्ट मंजूर झाले असून त्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे. लवकरच इमारतीचे सुद्धा काम सुरू होणार आहे. या तालुक्याला लागलेला दुष्काळी कलंक पुसून मी भविष्यामध्ये येणार्या नव्या पुढच्या सात पिढ्यांना पुरेल इतक्या पाण्याची ‘इस्टेट’ मी या तालुक्याच्या जनतेला देणार आहे. भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी कसा असावा, हे उदाहरण ठेवणार आहे. फलटण तालुका हा बारामतीच्या बरोबरीने घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानात जनतेने सहभागी व्हावे, असेही आवाहन खासदार रणजितसिंह यांनी केले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे यांनी सांगितले की, मेरी माटी, मेरा देश हे अभियान फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राबवले जाणार आहे. प्रत्येक गावातील मूठभर माती त्यामध्ये टाकून दिल्लीला जाणार आहे. फलटण तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे बूथअध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, संतोष सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोज कांबळे, महेश यादव, विशाल नलवडे, नवनाथ करे, गजानन लोखंडे, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.