
दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। फलटण । येथील फलटण आगारात विविध उपक्रम राबवून एस.टी.चा 77 वा वर्धापन दिन आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला. 1948 साली 1 जुन रोजी अहमदनगर – पुणे मार्गावर प्रथम एस.टी. धावली. यानिमित्त 1 जून रोजी एस.टी. महामंडळाचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो.
वर्धापन दिनानिमित्त फलटण आगारात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. केळीचे खुंट, नारळाच्या फांद्या प्रत्येक फलाटावर लावण्यात आल्या होत्या. ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना शुभेच्छा देण्यात येत होत्या.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, दैनिक स्थैर्य संपादक प्रसन्न रुद्रभटे यांच्या हस्ते सजवलेल्या बसचे विधिवत पूजन करून केक कापण्यात आला, उपस्थित प्रवाशांना गुलाब फुले व पेढे वाटण्यात आले.
यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम रणवरे, प्रभारी स्थानक प्रमुख सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रवींद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक गजानन रिटे, अधिकारी, कर्मचारी प्रवासी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा एस.टी .प्रशासनाच्या वतीने शाल व मोती माळा, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. एस.टी.च्या प्रवाशी प्रा. सायरा मुलाणी यांचाही सत्कार करण्यात आला. बस स्थानक स्वच्छ करणार्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

