
दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
जिल्ह्यातील पुसेसावळी येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे संभ्रम निर्माण होऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल करू नयेत, नाहीतर मेसेज व्हायरल करणार्या ग्रुपच्या अॅडमिनला कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी दिला आहे.
सुनील शेळके यांनी सांगितले आहे की, कोणत्याही ग्रुपवर आक्षेपार्ह एसएमएस, एमएमएस, फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटस्अॅप, ट्युटर, हॅलो, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमातून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे मेसेज, पोस्ट, चित्रफित, बातम्या प्रसारित करू नयेत. ज्या ग्रुपवरून असे मेसेज पोस्ट होतील, त्या ग्रुपच्या अॅडमिनला कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलीस अशा ग्रुपवर नजर ठेवून आहेत.
तसेच ग्रुप अॅडमिनने आपल्या ग्रुपचे मेसेज ‘ओन्ली अॅडमिन मेसेज’वर सेटींग करू घ्यावेत, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी केले आहे.