कोरोना त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यात मागील आठ दिवसात एकूण २८ नागरिक हे परदेशातून आलेले आहेत. त्यांची यादी फलटण प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. काल आलेल्या यादीनुसार युगांडा येथून आलेल्या चार व्यक्तींपैकी दोघांची कोरोनाबाबतची चाचणी हि पॉसिटीव्ह आलेली आहे. सदरील व्यक्ती ह्या ओमिक्रोनबाबतच्या हायरिस्क देशातून आलेल्या आहेत. त्यामुळे सदरील व्यक्तींची कोरोना विशेषतः ओमिक्रोनबाबतच्या लागणाऱ्या आरटीसीपीआर चाचणीसाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुणे येथे पाठवण्यात आलेले आहेत. तरी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी काळजी म्हणजेच बाहेर पडल्यावर मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर राखणे हि काळजी घ्यावी असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.

कोरोना विशेषतः ओमिक्रोन बाबतची धोका लक्षात घेता फलटण प्रशासन पूर्ण तयारीने लढण्यास सज्ज आहे. फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तातडीने तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून फलटण शहरामध्ये किंवा तालुक्यात प्रशासनाने कठोर पावले उचलण्याबाबतचे निर्देश सदर बैठकीमध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिले. सदर बैठकीनंतर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. यावेळी तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रांत पोटे गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांच्यासह फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची काळजी म्हणून तातडीने लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत. फलटण उपविभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण उपलब्ध झालेले आहे. तरी नागरिकांनी कोरोनाबाबत गाफील न राहता लवकरात लवकर लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, असे आवाहन सुद्धा यावेळी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!