दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे १९ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी फलटण येथील सजाई गार्डन कार्यालय येथे विशेष कॅम्प आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये त्यांची तपासणी होऊन पुढील कॅम्पमध्ये त्यांना उपयोगी साधने मोफत दिली जाणार आहेत. सदर कॅम्पमध्ये उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता जर आपण फलटण शहराचे रहिवासी असाल तर नागरी सुविधा केंद्र येथे तर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर ग्रामपंचातीच्या आपले सरकार सेवा केंद्र येथून विहित नमुन्यात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी व जेष्ठ नागरिकांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे १९ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी विशेष कॅम्प आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला (एक लाख ८० हजार पेक्षा कमी), आधार कार्ड, रेशन कार्ड हि कागदपत्रे आवश्यक आहेत. भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे हालचालीसाठी सहाय्यक साधने – प्रौढांसाठी व्हील चेअर, लहानांसाठी व्हील चेअर, तीन चाकी सायकल, तीन चाकी सायकल, कुबडी, चालण्याची काठी, सेरेब्रल पाल्सीमध्ये उपयोगी साधने – सीपी खुर्ची, दृष्टीदोषामध्ये उपयोगी साधने – ऑडिओ प्लेयर, स्मार्टफोन, स्मार्ट केन, ब्राइल्ले स्लेट, श्रवणदोषामध्ये उपयोगी साधने – डिजिटल हेअरिंग मशीन, बौद्धीक दिव्यांग व्यक्तींना उपयोगी साधने – अभ्यासउपयोगी विविध डिजिटल उपकरणे, कृत्रिम हात, पाय, वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी साधणे – चालण्याची काठी, चालण्यासाठी वॉकर, चष्मा, खुर्ची यासह विविध साधने देण्यात येणार आहेत, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.