स्थैर्य, फलटण, दि.२५: आगामी नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात पतंग व मांजा विक्रीला सुरुवात झाली असून मांजा विक्रेत्यांनी नायलॉन मांजाची विक्री करु नये. या माजांची विक्री करताना कोणी आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना फलटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी शहरातील मांजा विक्रेत्यांना दिली.
मांजा विक्रेत्यांसमवेत फलटण शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी ही सूचना दिली.
यावेळी मांजा विक्रेत्यांना नायलॉन मांजामुळे यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांबाबत माहिती देवून सीआरपीसी 149 प्रमाणे या मांजाची विक्री न करण्याबाबत नोटीस देण्यात आली असून नोटीशीचे उल्लंघन करुन नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी आढळून आल्यास पोलीसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही फलटण शहरवासियांना यावेळी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले.