दैनिक स्थैर्य | दि. १५ मे २०२३ | फलटण |
फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी शहरात कोणत्याही अवैध धंद्यांना थारा देणार नाही, गुटख्याचा स्टॉक करणारे व विक्री करणार्या तसेच चायनीज मांजा विकणार्या यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल, हे करतानाच नागरीकांशी योग्य समन्वय पोलिस प्रशासनाच्यावतीने राखला जाईल, अशी ग्वाही दिली.
शांतता कमिटीच्या फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड यांची उपस्थिती होती.
फलटण शहरातील बेशिस्त वाहतूक व पार्किंगच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन शहरातील वाहतुकीस शिस्त लावणार आहे. शहरातील पार्किंग, सम-विषम पार्किंग, नो पार्कींग व पार्कींग झोन याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच उपाययोजना केली जाईल, असे शंकर पाटील म्हणाले.
पुढे शंकर पाटील म्हणाले की, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वपूर्ण कार्य करते. शहरातील ही यंत्रणा सध्या बंद असल्याने याबाबत फलटण नगरपरिषदेशी समन्वय साधून ती पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. शहरातील वाढते नागरीकरण व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचा स्टाफ कमी आहे. ही कमी दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे स्टाफ वाढवून देण्याची मागणी केली जाईल.
फलटण शहरातील एमएसईबी ऑफिस इमारत ते मुख्य रस्ता या परिसरातील गल्ल्यांमध्ये रात्रीच्यावेळी तेथील अंधाराचा फायदा घेवून अश्लील चाळे चालतात. तरुण मुले धुम्रपान व अन्य नशा करतात. अनेकदा टोळक्याने ही मुले अश्लील व्हिडीओ पहात असतात. भरवस्तीत हा प्रकार घडत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देताच सायंकाळी या परिसरात पोलिसांची गस्त होईल व तसा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी स्पष्ट केले.
पुढील काळात फलटण शहर गुटखामुक्त करणार आहे. शहरात गुटख्याची चोरटी विक्री करणार्या गुटखा विक्रेत्यांवर पोलिस प्रशासन कडक कारवाई करेल. त्याचबरोबर शहरातील बहुतांश कॅफेचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी येथे परगावाहून शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे ही ठिकाणे उडाणटप्पूंची केंद्रे बनली असल्याचा प्रश्न उपस्थित होताच नियमांचे पालन न करणारांवर कडक कारवाई करणार आहे, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. फलटण शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात सडकसख्याहरींवर निर्भया पथकाद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस शांतता कमिटीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.