दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
बाभुळगाव (ता. माळशिरस) येथील तरुण युवक शंभूराजे समाधान सूर्यवंशी यास व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संघटनेच्या अंतर्गत असणार्या युवा छावा संघटनेचा या वर्षाचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता व ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील दुधेबावी या ठिकाणी ३ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता होणार आहे.
दुधेबावी येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड यांचा चिरंजीव, शालेय विद्यार्थी आर्यन भांड याचे दोन वर्षापूर्वी अकस्मात निधन झाले होते. तो व्यसनमुक्त युवक संघटनेच्या गुरुकुलमधील पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असल्याने सर्वांच्या आवडीचा होता. त्याच्या या आकस्मित जाण्याने भांड परिवार यांच्यावर संकट ओढवले असतानाही त्यांनी स्वतःस यातून सावरून आपल्या मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार या वर्षीपासून जाहीर केला आहे.
शालेय जीवनातील विद्यार्थी यांनी संकटास सामना करून आपले धैर्य पणाला लावणार्या युवकास हा पुरस्कार दिला जाईल, असे त्याचे वडील संतोष भांड यांनी यावेळी सांगितले. अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून प्रथम हा पुरस्कार माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथील बी.एन.वाय.एस. या पदवीचे शिक्षण घेणार्या शंभूराजे सूर्यवंशी यास देण्यात येणार आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शंभूराजे सूर्यवंशी व त्याचा भाऊ सूर्यवंशी यांचा वेळापूर-अकलूज या मार्गावर अपघात झाला होता. या अपघातामध्ये सयाजी सूर्यवंशी याचे निधन झाले व शंभूराजे सूर्यवंशी याचा एक पाय निकामी झाला. अशाही परिस्थितीत त्याने या अपघाताची खबर स्वतः फोनवरून वडिलांना देवून तत्परता दाखवली.
पुण्यातील नामवंत रुग्णालयात त्याने उपचार घेवून पुन्हा नव्याने भरारी घेत आपली गडकिल्ले भ्रमंती चालूच ठेवली. स्वतःचे दुःख विसरून तरुणांना व शालेय विद्यार्थी यांना तो व्यसनमुक्तीचे व्याख्यान देवू लागला. अशा परिस्थितीत त्याने सिंहगड हा किल्ला पायी सर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शालेय जीवनात कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्यावर मात करता येते, हे तो विद्यार्थी यांना आवर्जून सांगतो.
या कार्यक्रमास संघटनेचे सर्व पदाधिकारी, शिलेदार, माळशिर, फलटण, कराड, सातारा, दौंड, पुणे, नगर, सांगली या भागातील युवक उपस्थित राहणार असल्याचे संतोष भांड यांनी सांगितले.