स्थैर्य, मल्हारपेठ, दि.५: रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गटार बांधून देतो, असे आश्वासन दिल्यानंतर रखडलेल्या येथील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या 15 दिवसांपासून पोलिस स्टेशन ते हायस्कूलपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम येथील स्थानिक ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यानंतर रस्ते विकास महामंडळ व कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर गटार कामाच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर रखडलेल्या कॉंक्रीट रस्त्याला सुरवात झाली. कंपनीच्या विस्कळीत कारभारामुळे 15 दिवस स्थानिक नागरिकांना वाहनांच्या धुळीचा व वर्दळीचा त्रास सहन करावा लागला.
वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याने वरिष्ठ पोलिसांपर्यंत वाहतुकीच्या समस्येबाबत चर्चाही झाली होती. मात्र, गटाराची समस्या सुटल्याशिवाय रस्ता कॉंक्रिटीकरण करू नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर रस्ते विकास महामंडळाच्या अभियंता नाईक यांनी गटार बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर एल अँड टी कंपनीने कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू केले. संबंधित कंपनीने रस्त्याचे काम व गटाराचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.