
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२६ | सातारा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमधून रक्षाबंधन सणानिमित्त लांब पल्ल्यासह अन्य मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. भाऊ-बहिणीच्या प्रवासामधून एसटी मालामाल झाली. रक्षाबंधन सणादिवशी सुमारे २ कोटी १३ लाखांचा महसूल मिळाला.
महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमधून लांब पल्ल्यासह अन्य मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. जोडून आलेल्या सलग सुटट्यांमुळे एसटी प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. सणाच्या काळात मोठ्या संख्येने भाऊ-बहिणींनी एसटीचा प्रवास केल्याने महामंडळाच्या महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा बस फेर्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरांमध्येही प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक उपलब्ध झाली.
रक्षाबंधनाने एसटीच्या तिजोरीत भर पडल्याने महसूलात मोठी वाढ झाली. राखीच्या सणाने एसटीला महसूलचा आधार मिळाला. सातारा विभागाने रक्षाबंधन सणानिमित्त २८ ऑगस्ट रोजी विभागाच्या ११ आगारांमधून वाहतुकीचे योग्य नियोजन करून बसेस २.७७ लाख किमी चालवून सवलत मूल्यांसह २ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून प्रती कि.मी. उत्पन्न ७६.०४ रुपये मिळाले आहे.
प्रवाशांनी रा. प. महामंडळावर दाखविलेल्या विश्वासामुळे मागील वर्षीच्या रक्षाबंधन सणापेक्षा ०.१५ लाख कि.मी व ३८.७१ लाख उत्पन्न व ६.७१ रुपये प्रति किमी उत्पन्न जास्त मिळाले आहे. विभागातील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, सर्वआगार व्यवस्थापक व शाखाप्रमुख यांचे विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
