स्थैर्य, जळगाव,दि १०: तीन महिन्यांचे थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले. तर याच दरम्यान, जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता समोर आली. एसटी महामंडळाची कार्यपद्धती व मराठी माणसांच्या ठाकरे सरकारमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
मनोज अनिल चौधरी (३१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत एसटी वाहकाचे नाव आहे. चौधरी हे गेल्या आठ वर्षांपासून जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत होते. दरम्यान, त्यांनी दोन वर्षांपूर्वी खासगी पतसंस्थेतून कर्ज काढलेले होते. आता पगार होत नसल्यामुळे त्यांना नियमित हप्तेदेखील भरता येत नव्हते.
पैशांची चणचण
मनोज यांनी दोन वर्षांपूर्वी खासगी पतसंस्थेतून कर्ज काढले होते. त्याचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने ते चिंतेत होते. सकाळी वडिलांशी त्यांनी गप्पा मारल्या. नंतर वरच्या खोलीत गळफास घेतला.
महामंडळाच्या कार्यपद्धतीवरही बोट
एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळवून देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. आपला कृपाभिलाषी
राज्यभर आंदोलने
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या थकीत पगारासह महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी, या मागण्यांसाठी सोमवारी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन केले.
बँकांकडून घेणार कर्ज, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये : अनिल परब
मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे वेतन आणि अग्रिम रक्कम देण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. आता एका महिन्याचा पगार तत्काळ देण्यात येईल, तर आणखी एका महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देऊ. याशिवाय सणासाठी अग्रिमही दिला जाईल. त्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे ते म्हणाले.
गेंड्याच्या कातडीचे सरकार : गिरीश महाजन
हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यांना संवेदना नाहीत. दिवाळी तोंडावर असतानाही कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही. त्यामुळे कर्मचारी टोकाचा निर्णय घेत आहेत, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली.
काेकणामध्ये बीडच्या एसटी चालकाचा संशयास्पद मृत्यू
रायगड | रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह घरात आढळून आला. या चालकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३७) असे चालकाचे नाव असून ते मूळचे बीड येथील रहिवासी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे पगार वेळेवर होत नसल्याने या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.