श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद  यांच्या जयंतीनिमित्त दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा विभागाचे क्रीडाप्रमुख प्रा. प्रशांत सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रारंभी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी श्री मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

प्रास्ताविक क्रीडाप्रमुख प्रा. प्रशांत सावंत यांनी करताना क्रीडा हा जीवनाचा अविभाज्य घटक असून याचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले आहे. खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच मेजर ध्यानचंद यांच्या संपूर्ण जीवनपटाचे विश्लेषण उपस्थित विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडू विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे विविध क्रीडा स्पर्धेमध्ये आस्था दाखवून विद्यार्थ्यांना अभ्यास, यश, परिश्रम, ध्येय, चिकाटी, खिलाडू वृत्ती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आंतर महाविद्यालयीन व विद्यापीठीय आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी खेळ व क्रीडा हे विद्यार्थी जीवनात व्यक्तिमत्व घडविण्यास कसे सहाय्य करतात, हे विस्तृतपणे सांगितले. खेळाडू हा अभ्यासात कशी प्रगती करतो व सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्वाचे ते धनी असतात, मी महाविद्यालयीन जीवनात असताना विद्यापीठीय खेळाडू होतो, असे सांगून जुन्या आठवणी सांगितल्या व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी आंतरमहाविद्यालयीन व विद्यापीठीय विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापेत्तर कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी तनिष्का दौंडकर हिने केले, तर आभार कुमारी श्रद्धा शिर्के या विद्यार्थिनीने मानले.


Back to top button
Don`t copy text!