
थेट WhatsApp वर मिळवा
सकाळच्या वेळी पौष्टिक आहाराची सवय लावून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.
स्थैर्य, सातारा, दि. ०२ नोव्हेंबर : सकाळच्या नाश्त्यात बहुतांश वेळा चहासोबत तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र, रिकाम्या पोटी अशा पदार्थांचे सेवन केल्यास अपचनाची समस्या वाढू शकते. त्यामुळे नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये समाविष्ट करणे उत्तम मानले जाते. नियमित मूठभर मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यातून शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात.
बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे. विशेषतः सकाळच्या नाश्त्यात सकस आहाराचे सेवन केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण भरपूर असल्याने आरोग्यासाठी ते अतिशय गुणकारी ठरू शकतात.
पचनक्रिया सुधारते आणि वजन नियत्नात राहते
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे खाल्लेले अन्न सहज पचन होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हे प्रभावी ठरते. तसेच, हे नियमित खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही हातभार लागतो.
प्रतिकारशक्ती आणि स्नायू बळकटी
या कडधान्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जिम किंवा वर्कआउट करणाऱ्या व्यक्तींसाठी मोड आलेली कडधान्ये प्रोटीनचा उत्तम स्रोत मानली जातात, ज्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. सॅलड, सँडविच किंवा हलके फ्राय करून याचे सेवन करता येते.





