स्थैर्य, फलटण दि.9 : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला फलटण शहरातील व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदच्या पार्श्वभूमीवर काल दिवसभर सर्व दुकानदार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट पहायला मिळाला.
शेतकर्यांच्या मागण्यांना पाठींबा म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजार समिती आवारात शांतता होती.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने देखील शहरातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार यांना बळीराजाला पाठींबा देण्यासाठी या एक दिवसाच्या भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांनी 100% प्रतिसाद दिला. यामुळे शहरातील प्रमुख बाजार पेठ असलेला रविवार पेठ परिसर तसेच नेहमीच गजबजलेला डेक्कन चौक, डी.एड. चौक, एस.टी. स्टँड परिसर, शंकर मार्केट परिसर, पृथ्वी चौक, महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, घडसोली मैदान, क्रांतीसिंह नाना पाटील चौक या ठिकाणी शांतता पहायला मिळाली.