…. अन्यथा केंद्र सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : आमदार दीपक चव्हाण; ‘भारत बंद’ च्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरात पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त


 

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’च्या समर्थनार्थ फलटण शहरात महाविकास आघाडीच्यावतीने फेरी काढण्यात आली होती. त्याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, सचिन सूर्यवंशी – बेडके, प्रदीप झणझणे व राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छाया : योगायोग फोटो)

स्थैर्य, फलटण दि. ९ : केंद्र शासनाने कृषी विषयक जो कायदा पारित केला आहे. तो कायदा शेतकर्‍यांवर अन्याय करणारा असल्यामुळे ताबडतोबीने रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी करीत कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकर्‍यांच्याकडून अभूतपूर्व असे आंदोलन केले जात आहे. याची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घ्यावी अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिला. दरम्यान, ‘भारत बंद’ च्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरुन देशभरातील विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी वगैरेंनी काल दिनांक 8 रोजी भारत बंदची हाक दिली होती. या ‘भारत बंद’ च्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना वगैरे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरांतील प्रमुख मार्गावरुन फेरी काढून बंद मध्ये सहभागी व्यापारी, उद्योजक, फेरीवाले, टपरिधारक, हातगाडीवाले वगैरे सर्व घटकांना धन्यवाद दिले. या पार्श्‍वभूमीवर फलटण शहरातील बाजार पेठेमध्ये आज शांतता पहावयास मिळाली. फलटण शहरातील सर्व छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस नेते, नगरसेवक व श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), शिवसेना नेते प्रदिप झणझणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे वगैरेंच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिर येथे जमलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फलटण शहरातून शांततेच्या मार्गाने फेरी काढून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला आणि मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

श्रीराम मंदिर येथून निघालेली फेरी शिंपी गल्ली, रविवार पेठ, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, छ. शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गजानन चौक या मार्गाने शंकर मार्केट मार्गे श्रीराम मंदिर येथे पोहोचली.

यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन प्रा. भीमदेव बुरुंगले, सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, विजयकुमार लोंढे पाटिल, राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक महेंद्र सुर्यवंशी बेडके, माजी नगराध्यक्ष अड. बाबुराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, पंकज पवार, नितीन जाधव, प्रदीप मुळीक, शाहुजी मदने, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, माजी नगरसेवक अनिल शिरतोडे वगैरे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!