उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना विशेष सेवा पदक जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. २: सातारा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांना विशेष सेवा पदक २०२० जाहीर झाले असून त्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
        महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, मुबंईने गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात समाधानकारक सेवा पूर्ण केलेले पोलीस अधिकारी व अंमलदार आणि १ वर्ष समाधानकारक सेवा पूर्ण केलेले राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी अंमलदार अशा राज्यातील २६ अधिकाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार २०२० आज जाहीर केले आहेत. त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचा समावेश आहे.
   महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबईतून या विशेष सेवा पुरस्कारांची घोषणा होताच, त्यामध्ये फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या नावाचा उल्लेख पाहुन फलटण व खंडाळा तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी तानाजी बरडे यांचे समक्ष भेटून आणि मोबाईल व अन्य सोशल मिडियाद्वारे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
            नववर्षाच्या प्रारंभी तानाजी बरडे यांना जाहीर झालेले हे विशेष सेवा पदक त्यांच्या कार्याचा सन्मान करणारे असल्याचे अनेकांनी बोलुन दाखविले.
     दि. २९ जून रोजी महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झालेले उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रोबेशन पिरियड पूर्ण केल्यानंतर दि. १२ ऑगस्ट २०१७ ते दि. १४ ऑगस्ट २०१९ पर्यंत भाम्रागड (गडचिरोली) येथे दोन वर्षे पोलीस दलाच्या माध्यमातून समाधानकारक व उत्तम सेवा बजावली, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून फलटण येथे रुजू झाल्यापासून फलटण व खंडाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती पूर्ण नियंत्रणात ठेवण्याबरोबर गुन्हेगारी, अवैध धंदे यावर त्यांनी वचक निर्माण केला असून याकामी सहकारी पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांची साथ मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत.

Back to top button
Don`t copy text!