स्थैर्य, पुणे, दि.५: शेतकरी आंदोलन हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे, असे म्हणणाऱ्या मान्यवर कलाकारांच्या मताचा मी आदर करतो. तुम्ही तरी बोला ना शेतकऱ्यांच्या बाजूने. तुम्हाला कोणी अडवलंय. तुमच्या देशाचा प्रश्न आहे तर, आधी तुम्ही बोलते व्हा. मग परदेशातील कलाकारांना अडवा, असा सल्ला अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी दिला.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत परदेशातील कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर भारतीय कलाकारांनी या आंतरराष्ट्रीय कलाकारांना फटकारले आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी ही टिप्पणी केली. कटारी सीमेवर खिळे ठोकण्यात आले आहेत. हेच जर चीनच्या सीमेवर केले असते तर त्यांनी गाव वसवले नसते. आंदोलन करणारे शेतकरी काही दुश्मन नाहीत. ते आपले अन्नदाते आहेत, अशा शब्दांत भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
शब्द जपून वापरावेत
एल्गार परिषदेतील शर्जिल उस्मानी यांच्या भाषणामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. भाजपने शर्जिलला अटक करण्याची मागणी केली असून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले, बोलण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे. कधीही कुणावर टीका करताना, धर्माबाबत बोलताना शब्दांबाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे. बोलताना शब्द जपून वापरायला हवेत, शर्जिलला मनुवादावर बोलायचे होते. पण शब्द जपून वापरायला हवे. शर्जिलवर कोणते कलम लावायचे हा पोलिसांचा प्रश्न आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करतील.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार पक्षात येणार का?
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यासंदर्भात भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री राज्याचे आहेत. त्यांना कुणीही भेटू शकतो. फडणवीसही भेटू शकतात. मुनगंटीवारांना विचारा ते पक्षात येणार का?