पिंपळवाडी-साखरवाडी (तालुका फलटण) येथील राजकीय क्षेत्रातील एक आघाडीचे लोकप्रतिनिधी, महानंद डेअरीचे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार (अण्णा) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा…
साखरवाडी-पिंपळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील धार्मिक वातावरणात डी. के. पवार यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांना धार्मिक संस्कार आई-वडिलांकडून मिळाले. आई शेवंताबाई पवार, वडील कोंडीबा पवार अत्यंत धार्मिक होते. पहिल्यापासूनच विठ्ठलभक्ती व हरिपाठ, ज्ञानेश्वरी गाथा, रामायण, महाभारत इ. धार्मिक ग्रंथांचे घरात वाचन. वारकरी संप्रदायातील तसेच हरिभक्त पारायण, विविध कीर्तनकारांचा सहवास लाभलेल्या अण्णांना लहानपणापासून खेळाची आवड होती. पिंपळवाडी गावात तालीम असल्याने तेथेच त्यांना कुस्तीचे धडे मिळाले. अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी आपली कसदार शरीरयष्टी बनवली. कुस्तीचा छंद लागला. जेथे जाईल तिथे ते कुस्तीमध्ये जिंकून यायचे. त्यांची तशी जिद्द असायची. गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेले होते, पुढे फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी गेले असता, तेथेही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना दोन वर्ष वर्गप्रतिनिधी, त्यानंतर विद्यापीठ प्रतिनिधी आणि शिवाजी विद्यापीठावर सांस्कृतिक मंडळावर त्यांची त्यावेळी निवड झाली होती. संघटन कौशल्यावर अण्णांनी अमाप मित्रपरिवार जमवला होता. पिंपळवाडीच्या लाल मातीतल्या या पैलवानाचे सगळीकडे नाव झाले होते. अण्णांची कुस्ती जिकडे जाईल तिकडे गाजत होती. त्यांची कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीशौकीन गर्दी करत होते. त्यांच्याकडे कबड्डी खेळातील सुद्धा चपळाई होती. याही खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले होते. या स्पर्धेतून सातारा जिल्हा संघात चाचणी स्पर्धेतून त्यांची निवड झाली. कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत त्यांना खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी पवार यांचे व्यक्तिमत्व बहरत गेले, लोकप्रियता वाढत गेली. याच काळात त्यांनी पिंपळवाडी गावात जय हनुमान व्यायाम मंडळाची स्थापना केली. या मंडळामार्फत त्यांनी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत विशेषतः नागपूर येथील अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत हनुमान मंडळाला सातवेळा खेळण्याची संधी मिळविली. त्यावेळी अण्णा या मंडळाचे अध्यक्ष व टीमचे कप्तान होते.
त्याकाळी मुधोजी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे तेथे आवडते विद्यार्थी असल्याने, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे त्यांच्यावर संस्कार घडत गेले. कुस्तीची देवता बजरंग बलीची त्यांच्यावर कायम कृपा असून भक्ती व शक्तीच्या जोरावर अण्णांची प्रत्येक क्षेत्रातील उंच उंच झेप म्हणजे मारुतीच्या उड्डानासारखी असायची.
महाविद्यालयीन जीवन संपन्न झाल्यानंतर अण्णांचा विवाह सौ. कौशल्या पवार यांच्याशी झाला. तेथून त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. डी. के. पवार यांची खर्या अर्थाने राजकीय वाटचाल तेथून सुरू झाली. त्यांना त्यांच्या पत्नीची खूप मोठी साथ मिळत गेली. त्यानंतर अण्णा कधीच थांबले नाहीत.
सुरुवातीला फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि पुढे पक्ष बळकट करण्याची वरिष्ठांनी त्यांच्यावर १९८२ साली सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पुढे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली असता, महाराष्ट्रात ७० हजार एकर क्षेत्र असणार्या शेती महामंडळावर अण्णांची संचालक मंडळावर निवड झाली. याच काळात अण्णांना वृक्षारोपणाची आवड असल्याने १९८२ साली देशाच्या माजी पंतप्रधान व स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी हाती घेतलेल्या २० सूत्री कार्यक्रमाचा भाग म्हणून वृक्षारोपण संवर्धन या उपक्रमांतर्गत शेती महामंडळाच्या ७० हजार जमिनीपैकी काही क्षेत्रावर १० लाख रोपांची लागवड व वृक्षसंवर्धनाचे काम पूर्ण केले. तत्कालीन महसूलमंत्री नामदार शांताराम घोलप यांच्या हस्ते हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.
शेती महामंडळाच्या साखरवाडी ऊस मळ्यावर एक हेक्टर मुरुमाड व खडकाळ जागेवर सुरुंग लावून खड्डे घेतले. तेथे निलगिरी व सुबाभूळ वृक्षांची लागवड करून या क्षेत्राला ‘संजय वन’ असे नाव देऊन हे कामही अण्णांनी पूर्ण केले. याच काळामध्ये फलटण तालुका संजय गांधी निराधार समितीवर अण्णा काम करत होते. अनेक निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी यावेळी केले. गोरगरीब निराधार लोकांचा आशीर्वाद अण्णांच्या पाठीशी कायमच राहत गेला.
पुढे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते १९९९ साली डी. के. पवार यांना महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य वनश्री’ पुरस्कार दिला गेला. याच पुरस्कारा बरोबर स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठान शेरेचीवाडी, ता. फलटण तसेच फलटण मेडिकल फाउंडेशन, ब्लड बँक फलटण व ग्रंथालय सन्मान पुरस्कार २००५-०६ ला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ २०१३ ला देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर फलटण तालुक्याचे माजी आमदार चिमणराव कदम यांच्या कारकिर्दीनंतर फलटण तालुक्यात श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली राजे गट सक्रिय झाला. १९९२ च्या निवडणुकीत श्रीमंत संजीवराजे फलटण पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर २०१२ मध्ये साखरवाडी जिल्हा परिषद गटातून श्रीमंत शिवांजलीराजे यांना निवडून आणण्यात अण्णांनी कष्ट घेतले. याच काळात संजीवराजे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पुन्हा २०१७ मध्ये शिवांजलीराजे यांना पुन्हा याच गटातून निवडून देताना डी. के. पवार यांनी त्यागाची भूमिका घेतली होती. १९९५ साली श्रीमंत रामराजे आमदार झाले. रामराजेंना विधान परिषदेचे सभापतीपद मिळाले. डी. के. पवार यांनाही रामराजे यांचे मोलाचे सहकार्य लाभत गेले.
साखरवाडीच्या ग्रामपंचायतीवर अण्णांनी तीनवेळा निवडून येऊन हॅट्ट्रीक मिळवली होती. होळ विविध कार्यकारी सोसायटीवरही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. १९९९ मध्ये डी. के. पवार फलटण दूध संघाचे चेअरमन झाले. आत्तापर्यंत तेथेही ते कार्यरत आहेत. अनेक संधी त्यांना मिळत गेल्या. २००५ ते २०१० अशा पाच वर्षे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कौशल्य पवार या साखरवाडी ग्रामपंचायतीवर सरपंच होत्या. याच काळात त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यावेळी गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले. यामध्ये तंटामुक्तीचा शांतता पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ‘एक गाव एक गणपती’ पुरस्कार, साखरवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यावेळी महाराष्ट्र राज्यात कबड्डीची टीम प्रथम क्रमांक आली व यामधून तीन मुलींना देश पातळीवर खेळण्याची संधी मिळाली. हे सर्व अण्णांच्या सहकार्यातून घडत गेले.
महाराष्ट्र राज्य कृती समितीवर फलटण तालुका दूधसंघाचा प्रतिनिधी म्हणून डी. के. पवार काम पाहत असल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन राज्य महासंघ डेअरीची निवडणूक कृती समितीच्या प्रयत्नातून लावली. त्यामुळे महासंघाच्या पहिल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी महानंदच्या संचालिका झाल्या. तेथे ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी प्राप्त झाली. २००३ साली डी. के. पवार यांनी आपल्या आईच्या नावाने शेवंताबाई पवार ग्रंथालय व वाचनालयाची स्थापना केली. तेथे पुढे जाऊन राज्याच्या राष्ट्रवादी ग्रंथालय विभागावर काम करण्याची संधी अण्णांना मिळत गेली व याच संधीचा फायदा घेऊन अण्णांनी ग्रंथालयाचे अनुदान दुप्पट करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावात म्हणजे पिंपळवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ट्रस्टची स्थापना करून या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे काम अण्णांनी केले.
डी. के. पवारांनी राजकारण न करता नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्याला प्राधान्य दिले. गावामध्ये तसेच समाजामध्ये वावरत असताना कुठलाही मतभेद व जातीपातीचे राजकारण त्यांनी कधीही केले नाही. सर्वांशी एकोप्याने, समभावाने मिळते जुळते घेऊन, कधीही कोणावर न रागवता अण्णांचा राजकीय प्रवास आजपर्यंत चालू आहे. अण्णांना धार्मिक कार्याची आवड असल्याने गावच्या धार्मिक कार्यात ते नेहमीच एक पाऊल पुढे असतात. त्यांनी पिंपळवाडी साखरवाडी गावात आपल्या मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे राबवून अनेक लोकांना पुन्हा दृष्टी देण्याचे कामही त्यांनी केले आहे. गावातील अनेक धार्मिक मंदिरांचा त्यांचा जीर्णोद्धार करण्यात मोलाचा वाटा आहे, आजही करत आहेत.
२०१६ पासून महानंद डेअरी, मुंबई येथे अण्णा कार्यरत होते. ते महानंदचे उपाध्यक्षही होते. याच काळात महानंद चांगल्या पद्धतीने चालवण्याची संधी मिळाली. कोरोना काळात अण्णांनी राज्यभरातील प्रत्येक दूध संकलन विभागावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला. एक ना एक अनेक ठिकाणी अण्णांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत गेली. या संधीचे त्यांनी नेहमी सोने करून दाखवले, म्हणून संत तुकारामाच्या ओवीप्रमाणे म्हणायचे झाले तर
‘अण्णांसारखा पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’.
अण्णांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ईश्वर कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना…
– किसन भोसले, पत्रकार,
साखरवाडी – ९९६०३१९५१४