स्थैर्य,सातारा, दि.१५ : सोशल मीडियामुळे डेटा अर्थात माहितीचे केंद्रीकरण होत असून माणसे हीच प्रॉडक्ट अर्थात उत्पादन म्हणून विकली जात आहेत असे सांगून युवा कार्यकर्ता विचारवंत मयुर अरुणा जयवंत यांनी सोशल मीडियाचे व्यसन आपल्याला लागू नये यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
खटाव तालुका पत्रकार संघाचे वतीने खटाव तालुक्यातील जेष्ठ पत्रकार स्मृतीशेष एम.आर.शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवा सामाजिक कार्यकर्ते मयुर अरुणा जयवंत यांचे सोशल मीडिया व समाजापुढील आव्हाने याविषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मयुर अरुणा जयवंत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी चे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके होते.
सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचे एक अविभाज्य भाग झालेला आहे. सोशल मीडियाचे बरे वाईट परिणाम हे आपल्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक जीवनावर होत आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. असे सांगून मयुर अरुणा जयवंत म्हणाले की सामाजिक नातेसंबंध अधिक दुरावत आहेत. आणि अफवा पसरवून दंगली आणि सामाजिक तणाव निर्माण करण्यात सोशल मीडिया अग्रेसर आहे.
सोशल मीडिया फक्त माहितीचे केंदीकरण करत नसून आपले व्यक्तिमत्व बदलत आहे. सोशल मीडिया मानवी तंत्रज्ञान करणे हि आपली जबाबदारी आहे. त्यासाठी त्यातील धोके ओळखून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
विजय मांडके यांनी एम.आर.शिंदे यांच्या पत्रकारीतेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली आणि सकारात्मक पत्रकारीतेची गरज अधोरेखित केली.
संजय शिंदे यांनी आभार मानले.