फलटण नगर परिषद शाळेच्या पुनर्बांधणीचे काम नियमबाह्य व बेकायदेशीर; २२ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथील नगर परिषदेच्या सिटी सर्वे नं. १७७४ या जागेवर शाळेच्या पुनर्बांधणीची विकासकामाची प्रक्रिया नियमबाह्य व बेकायदेशीरपणे सुरू आहे. हे तयार केलेले कामाचे अंदाजपत्रक मुख्याधिकारी (प्रशासक) व तत्कालीन नगर अभियंता व बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी संगनमत करून पैशांच्या अपहार करण्याच्या द़ृष्टीने तयार केले आहे, असा आरोप करत हे काम थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या कामासंदर्भात शहरातील अनेक जबाबदार संघटनांनी, पक्षांनी व नागरिकांनी शाळेच्या क्रीडांगणावर शॉपिंग सेंटरची निर्मिती झाल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते म्हणून वारंवार सूचना व तक्रारी दाखल केल्या, तरीही या ठिकाणी मुख्याधिकार्‍यांनी हे काम सुरूच ठेवले आहे. यात ठेकेदाराचा फायदा कसा होईल, याचेच मुख्याधिकार्‍यांकडून हित पाहिले जात आहे. या कामाकरीता २ कोटी २५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून करोडो रुपयांचा अपहार करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न केला गेला आहे. याबाबत मी वारंवार लेखी सूचना, तक्रारी देऊनही माझ्या तक्रारींची कुठलीही दखल घेतली जात नाही. मुख्याधिकार्‍यांकडून शहरात अनेक प्रकारची दर्जाहीन, बेकायदेशीर कामे सुरू असून वित्तीय अनियमितता त्यांनी केली आहे. याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी, म्हणून आता मला उपोषणास बसावे लागत आहे, असे मोरे यांनी म्हटले आहे.

मोरे म्हणाले की, मी दि. २२ सप्टेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणास बसणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी (प्रशासक) व महाराष्ट्र शासन यांची राहील, असा इशारा नंदकुमार मोरे यांनी पत्राद्वारे दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!