कोयत्याच्या घावांनी रक्तबंबाळ झालेल्या पुळकोटीच्या स्नेहलला अखेर मृत्यूने कवटाळले

संशयित अमोल मुळेला फासावर लटकवण्याची मागणी

दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२६ | सातारा |
पालघर येथे कोयत्याने प्राणघातक हल्ला झालेल्या पुळकोटी (ता. माण) येथील स्नेहल सावंत (वय २७) या युवतीवर सातार्‍यात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला. ती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत संशयित अमोल मुळे (जि. बीड) याला फासावर लटकवावे, अशी मागणी केली आहे.

पालघरमधील गोल्ड सिनेमा परिसरात १२ जून रोजी स्नेहल हिच्यावर एकतर्फी प्रेमातून भरदिवसा कोयत्याने हल्ला झाला होता. हल्लेखोराने स्नेहलच्या मानेवर व कमरेवर सपासप वार केले होते. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले. पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासचक्रे गतिमान करून हल्लेखोर मुळेला पकडले.

स्नेहल हिच्यावर हल्ला झाल्याचे समजताच पुळकोटी येथील तिचे कुटुंबीय पालघर येथे गेले. स्नेहलवर उपचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी तिला कुटुंबीयांनी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात आणले. गेली सव्वा दोन महिने तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला.

स्नेहल हुशार असल्याने स्पर्धा परीक्षेचा ती अभ्यास करत होती. कुटुंबाची परिस्थिती बदलावी यासाठी ती प्रयत्न करत होती. ७ महिन्यांपूर्वी स्पर्धा परीक्षेद्वारे तिची लिपीक पदासाठी निवड झाली. मुलगी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर सावंत कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही; मात्र अवघ्या ७ महिन्यांत स्नेहलच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

Back to top button
Don`t copy text!