फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांच्या कत्तली; नागरिक सावलीसाठी पारखे

वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ झाली तरच झाडांचे अस्तित्व टिकणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यात वन विभाग व विविध सामाजिक संघटनांनी अत्यंत चांगली वृक्षारोपणाची मोहीम राबवली. मात्र, वृक्ष लावत असताना ती जगवणे महाकठीण झाल्याने अनेक ठिकाणची झाडे वाळून, जळून गेली असून हायवेच्या कामात अनेक ठिकाणी झाडांच्या कत्तली झाल्याने सावलीसाठी वृक्षांची उणीव यावेळी नागरिकांना चांगलीच भासली आहे. वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे तरच झाडांचे अस्तित्व टिकणार आहे.

फलटण तालुक्यात वनविभागाने अतिशय चांगली वृक्षारोपणाची चळवळ उभी केली. वृक्षारोपण चळवळ ही लोकचळवळ होणे काळाची गरज आहे. मात्र, याची नागरिकांकडून फारशी दखल घेतली जात नसल्याने अनेकांच्या घराच्या अवतीभवती असणारी झाडे वाळून गेली तरी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नागरिकांचीच उदासीनता फलटण तालुक्याला हिरवेगार बनवण्यात अडथळा निर्माण करत आहे.

सध्या फलटण तालुक्यात फलटण ते वाठार स्टेशन, पंढरपूर फलटण पुणे व फलटण ते बारामती या रस्त्यांची चार पदरी व सहा पदरी रुंदीकरणाचे कामे चालू आहेत. यामध्ये शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. कत्तल केलेल्या झाडांपेक्षा दुप्पट झाडे लावणे संबंधित ठेकेदारांवर बंधनकारक आहे. मात्र, त्यांनी लावलेल्या झाडांचा पत्ता अद्याप सापडलेला नाही.

तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांची जी अवैध कत्तल झाली आहे, त्याबाबत वन विभागानेसुद्धा कडक कारवाई करण्याची गरज आहे. अनेक वखारी तसेच दूध कंपन्यांच्या आवारात कापलेली झाडे दिसत आहेत. फलटण शहरातील काही बिल्डरांनी अवतीभवती असणारी झाडे बांधकामासाठी तोडल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. परवानगी एकाची घ्यायची आणि सगळेच तोडायचे, असा प्रकार सुरू आहे. शहरातील रिंग रोड ते पृथ्वी चौक रस्त्यावरील तोडलेल्या झाडांची चौकशी होणे गरजेचे आहे. यावर वनविभाग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!