अट्टल चोराकडून सहा चार चाकी वाहनांचे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ असलेला आरोपी शाहरुख राजू पठाण (वय २५, राहणार नीरा) व त्याची पत्नी पूजा यांनी टेम्पो ४०७ (क्रमांक एमएच-१२- एमव्ही २७२३) हा चोरी केला. हा टेम्पो फलटण ग्रामीण पोलिसांनी वडजल गावाजवळ गोपनीय माहिती मिळाल्याने अडवला व सदर दोन्ही आरोपी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये शिरसाई मंदिर चोरीमध्ये पूर्वी अटकेत होते, हे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहीत होते, त्यामुळे या आरोपींवर टेम्पो चोरीबद्दल पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून टेम्पो जप्त केला.

सदर आरोपी हा संशय येऊ नये म्हणून त्याच्या पत्नीसोबत घरफोडी व वाहन चोरी करत होता. दोन्ही आरोपी हे अनाथ आहेत, त्यांना कोणतीही स्थावर, जंगम मालमत्ता नसून त्यांना कुणीही नातेवाईक नाही, हे पोलिसांना माहीत होते. यवत पोलीस ठाणे येथे चोरी करतानाचे फुटेज यवत पोलिसांना मिळालेले आहेत, ते या आरोपींशी मिळतेजुळते आहेत.

सदर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपीने दोन महिन्यांपूर्वी जेलमधून सुटल्यानंतर पुणे शहरातून दोन इको कार व एक अल्टो कार चोरी केली आहे. तसेच दौंड शहरांमधून दोन मोटरसायकल व यवत पोलीस ठाण्यातून एक पिकअप तसेच जेजुरी पोलीस ठाण्यातून एक पिकअप चोरी असे सात वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगून सदर वाहने त्याने पंढरपूर येथील दोन युवकांच्या सांगण्यावरून चोरले होते व त्याची विल्हेवाट ते लावून देतील, असे सांगितले होते. तसेच इस्लामपूर येथील एक भंगारवाल्याने सदरची वाहने तोडून स्क्रॅप करून विकून देण्याची हमी दिल्याने त्याने चोरली होती व त्यांनाच त्यांच्या आश्वासनामुळे हे टेम्पो ४०७ देण्यासाठी निघालेला होता.

सदर इसमांची नावे खालील प्रमाणे :
१) माऊली तानाजी वाघमारे (२८, राहणार पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर)
२) सागर रावण वाघमारे (३३, राहणार पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर)
३) अल्ताफ इसराइल खान (४९, राहणार इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली)

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी पती-पत्नीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे व चार चाकी वाहने विल्हेवाट लावणार्‍या वरील तिघांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

चोरी करणार्‍या नवरा-बायको आरोपींवर यापूर्वी बारामती, फलटण, यवत, जेजुरी, कामशेत, डेकन, एमआयडीसी, दौंड येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, पेठ नाका या ठिकाणी आरोपी अल्ताफ इसराइल खान याचे भंगारचे गोडाऊन असून सदर ठिकाणी वरील चोरलेल्या गाडीपैकी एका गाडीची चेसीज नंबर मिळालेली आहे. तसेच पंढरपूर येथील आरोपीच्या मोबाईलमध्ये चोरी करणार्‍या आरोपीने पाठवलेले गाड्यांचे चोरी केल्यानंतरचे फोटो मिळालेले आहेत. रात्री इस्लामपूर येथील भंगार गोडाऊनवर छापा मारला असता, त्या ठिकाणी अनेक गाड्यांचे सुटे पार्ट व इंजिन निदर्शनास आले. सदर अल्ताफ खानकडे कोणतेही आरटीओचा वाहन तोडण्याचा परवाना नव्हता किंवा आरटीओने वाहन स्क्रॅप करण्याचा प्रत्येक वाहनाचा परवाना सुद्धा त्याच्याकडे नव्हता व इतर कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड त्याच्याकडे मिळून आले नाही.

यातील चोरी करणारे नवरा-बायको आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींना आज अटक करण्यात आलेली आहे व त्यांचा दावा वरील सर्व पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने जवळजवळ ३३ लाख ६० हजार रुपये किमतीची मोटार वाहनांची चोरी उघड केली असून ७ लाख ७० हजार रुपये किमतीचे मोटार वाहन जप्त केलेले आहेत व बाकी वाहने आरोपीने बेकायदेशीरपणे स्क्रॅप केलेली आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस शिपाई श्रीकांत खरात, सोमनाथ टीके, हनुमंत दडस, विक्रम कुंभार, रशिदा पठाण यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!