
फलटण अभियांत्रिकी महाविद्यालया मार्फत आयोजित अभियंता दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
स्थैर्य, फलटण, दि.१५: फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण यांनी आयोजित केलेल्या अभियंता दिन कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्युबिलंट लाइफ सायन्सेस कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री सतीश भट उपस्थित होते. तसेच भाभा आटोमिक रिसर्च सेंटरचे श्री. आर के सिंग यांनी न्यूक्लिअर सायन्स समाजाच्या जडणघडणीमध्ये कशा प्रकारे उपयोगी पडते यावर मार्गदर्शन केले व न्यूक्लिअर मटेरियल बाबत लोकांच्यात असणाऱ्या गैरसमजामुळे याचा उपयोग करताना अडचणी येत असतात या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यां पासून मोठ्या उद्योगा पर्यंत सर्वांसाठी करता येतो व यापासून धोका नसतो असे प्रतिपादन त्यांनी केले. पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक चेअर प्रोफेसर डॉ एस. ए. कात्रे यांनी गणित, न्यूक्लिअर तन्त्रज्ञान व उद्योग क्षेत्र यात समन्वय साधला असल्याचे प्रतिपादन करुन अभियन्तादिनाच्या शुभेछा दिल्या.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस भारतामध्ये अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.त्याचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व युवा अभियंत्यांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेता यावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाचे निवृत्त प्रा. डॉ. उल्हास दिक्षित यांनी कोविड-19 या महामारीबाबत सांखिकीय विश्लेषण केले. यामध्ये कोविड-19 बाधित रुग्णांची वाढती संख्या व याबाबत त्यांनी केलेले संशोधन त्यांनी सादर करून महामारी कधीपर्यंत आटोक्यात येईल याचे गणिताच्या सहाय्याने विश्लेषण केले.या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन अकॅडमी ऑफ इंडस्ट्रियल अँड ऍप्लिकेबल मॅथेमॅटिक्स व भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे श्री. सतीश भट व श्री.आर के सिंग प्रा. डॉ. उल्हास दिक्षित यांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजय देशमुख यांनी मानले. प्रा.सौ. धनश्री भोईटे यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.