
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण थांबू नये यासाठी १,२३८ अनुदानित महाविद्यालयांत समुपदेशक नेमले असून, २७ नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ नोव्हेंबर : एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण कोणत्याही आर्थिक, सामाजिक किंवा भावनिक अडचणीमुळे थांबू नये, यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील १ हजार २३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या (एमएसएफडीए) माध्यमातून शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ही माहिती दिली.
दोन टप्प्यांत होणार प्रशिक्षण आणि सर्वेक्षण
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कल्याणकारी योजना राबवता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून, राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल पाल्यांची नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. समुपदेशकांचे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पार पडेल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून तीन ‘मास्टर ट्रेनर्स’ निवडून त्यांना २७ नोव्हेंबर रोजी एमएसएफडीए येथे प्रशिक्षण दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात हे प्रशिक्षक विद्यापीठ स्तरावर सर्व १,२३८ महाविद्यालयांतील समुपदेशकांना प्रशिक्षित करतील.
विद्यार्थ्यांसाठी हक्काचा आधार
प्रत्येक अनुदानित महाविद्यालयात नेमलेले हे समुपदेशक एकल पाल्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करतील आणि शासकीय सुविधांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष ठेवतील. “एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, ही शासनाची भूमिका आहे. प्रत्येक महाविद्यालयातील समुपदेशक या विद्यार्थ्यांसाठी हक्काचा आधार ठरतील. बागला समितीच्या शिफारसी आणि सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार ठोस योजना आखल्या जातील,” असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.



