एसटीच्या १५० कोटींच्या स्मार्ट कार्ड कंत्राटावरून वाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चौकशीचे निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १५० कोटींच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर चौकशीचे आणि अहवालाचे निर्देश दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २५ नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १५० कोटी रुपये किमतीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. संबंधित कंपनीची व्यावसायिक पार्श्वभूमी आणि प्रवाशांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियेचा सविस्तर अहवाल मागविला आहे.

कंपनीची पार्श्वभूमी आणि प्रवाशांच्या डेटा सुरक्षेचा प्रश्न

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रवासात सवलतींचा लाभ देण्यासाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड योजना सुरू केली असून हे कंत्राट एबिक्स लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीच्या कंपनीकडे हे कंत्राट असल्याचा आरोप होत असून यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये ३८ हजार ६२२ इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन पुरवठ्याचे कंत्राटही याच कंपनीला दिले गेले होते. या कार्ड नोंदणीसाठी सुमारे एक कोटी प्रवाशांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांक व पत्ता संकलित केला जात असल्याने या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

निविदेपासून करारनाम्यापर्यंत सर्व कागदपत्रांची तपासणी

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निविदा प्रक्रियेची सुरुवातीपासूनची सर्व माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. निविदेतील अटी-शर्ती, सहभागी कंपन्यांचे देकार, तांत्रिक व आर्थिक पात्रतेचे निकष, निविदा समितीचे इतिवृत्त, अंतिम मंजुरी, कार्यादेश आणि करारनामा या सर्व कागदपत्रांची आता तपासणी होणार आहे. या अहवालातून निविदा प्रक्रियेची पारदर्शकता स्पष्ट होणार का, याकडे प्रवासी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!