अनंत चतुर्दशीचे महत्त्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । सातारा । गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून केल्या जाणार्‍या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणार्‍या या व्रताविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखातून जाणून घेऊया. यावर्षी अनंत चतुर्दशीचे व्रत 9 सप्टेंबर या दिवशी केले जाईल.
1. तिथी : ‘भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते.
2. अर्थ : अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती.
3. उद्देश : मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते.
4. व्रत करण्याची पद्धत :‘या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.
5. अनंतव्रताच्या दिवसाचे महत्त्व, तसेच या व्रतात दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन करण्याचे कारण
अनंताचे व्रत करण्याच्या दिवसाचे महत्त्व :
अनंताचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चेतनास्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात. श्री विष्णुतत्त्वाच्या उच्चाधिष्ठीत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा तरी सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदु धर्मात योजना केली आहे.
शेषाचे कार्य : शेषदेवता श्री विष्णुतत्त्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते; म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आढळते. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणा‍ार्‍या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपात असल्याने शेषरूपी देवतेच्या पूजाविधानाने या लहरी त्याच रूपात जिवाला मिळणे शक्य होते.
6.अनंतव्रतातील 14 गाठींच्या दोर्‍याचे महत्त्व :
मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोर्‍याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठींवर आवाहन केले जाते. दोर्‍यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसर्‍या ग्रंथीपर्यंत वहाणार्‍या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोर्‍याची मंत्रांच्या साहाय्याने प्रतीकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्री विष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्त्वाची दोर्‍यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारीत होतो. यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास साहाय्य मिळते. पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभारीत नवीन दोरे बांधले जातात. अशा रितीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न, तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते.’
7.अनंतव्रतात यमुनेचे पूजन करण्याचे महत्त्व :
यमुनेच्या डोहात श्रीकृष्णाने कालियारूपी क्रियाशक्तीच्या स्तरावरील रज-तमात्मक अशा असुरी लहरींचा नाश केला. यमुनेच्या पाण्यात श्रीकृष्णतत्त्वाचे प्रमाण अधिक आहे. या व्रतात कलशातील पाण्यात यमुनेचे आवाहन करून पाण्यातील श्रीकृष्णतत्त्वस्वरूप लहरींना जागृत केले जाते. या लहरींच्या जागृतीकरणातून देहातील कालीयारूपी सर्पिलाकार रज-तमात्मक लहरींचा नाश करून आपतत्त्वाच्या स्तरावर देहाची शुद्धी करून मगच पुढच्या विधीला प्रारंभ केला जातो. याच कलशावर शेषरूपी तत्त्वाची पूजा केली जाते आणि श्री विष्णूचेच रूप असणार्‍या श्रीकृष्णतत्त्वाला जागृत ठेवले जाते.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ  ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ 
संकलन – श्री. हिरालाल तिवारी
संपर्क – 9975592859

Back to top button
Don`t copy text!