दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दोन्ही महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध व कठोर परिश्रमाला पर्याय नाही, स्वतःमधील कमकुवत गोष्टींचे रुपांतर बलस्थानात केल्याने आपल्याला हवी ती गोष्ट आपण साध्य करू शकतो, फलटण शहराचा ऐतिहासिक वारसा व फलटण एज्युकेशन सोसायटी स्थापनेचा इतिहास तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण हे आधुनिक कार्यक्षमता व सर्व सोयींनी परिपूर्ण महाविद्यालय आहे व प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचाल करण्यासाठी सदैव प्रयत्न राहील.
कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वर्ग, सोयीसुविधा व इतर कर्मचार्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकास व कल्याणासाठी घेतल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती घ्यावी व त्यादृष्टीने भविष्यात योग्य वाटचाल करावी, असे मार्गदर्शन प्रवेशित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी, पालक, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमारी तनिष्का दौंडकर व कुमारी तन्वी लोकरे व आभार डॉ. आर. व्ही. करचे यांनी केले.