दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
ऑल इंडिया डान्स असोसिएशन यांच्यातर्फे अयोध्या येथे घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत मुधोजी हायस्कूल फलटणची अदिती पावणे हिची सातारा जिल्ह्यामधून महाराष्ट्रातर्फे १४ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत एकमेव निवड झाली होती. ही स्पर्धा अयोध्या येथे संपन्न झाली होती. फलटण तालुक्याचे, सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राच राज्याचे नाव उंचावून ‘लोकनृत्य’ या डान्स प्रकारामध्ये भारतात तिसरा क्रमांक तिने अभिमानाने पटकावला.
अदिती नृत्याचे प्रशिक्षण नृत्यकला अकॅडमी येथे प्रशांत भोसले सर यांच्याकडे घेत आहे. या स्पर्धेसाठी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर आहिवळे सर यांनीही तिला मार्गदर्शन केले आहे.
अदितीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने या स्पर्धेसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष अशी आर्थिक मदत तिला केली होती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अदितीने आश्वासन दिल्याप्रमाणे मेहनत घेऊन आपल्या फलटणचे नाव संपूर्ण भारतात गाजवले आहे.
नृत्यामध्ये सुद्धा अशा मोठ्या स्पर्धा असतात, स्पर्धा जिंकल्यास त्याचा फायदा दहावीच्या गुणांमध्ये होतो, अशा स्पर्धेसाठी आपल्या पाल्यांना तयार करावे, असे आवाहन नृत्यकला अकॅडमीचे प्रशांत भोसले सर यांनी केले आहे. जेणेकरून आपल्या फलटणचे नाव असेच संपूर्ण भारतभर कलाक्षेत्रात गाजत राहील.
कला क्षेत्रात फलटणचे नाव उंचवल्याबद्दल अदितीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तसेच तिला अनेक मान्यवर शुभेच्छा देत आहेत.