
दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२३ | फलटण | राज्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सन १९९१ पासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत. फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष, अपक्ष आमदार, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष, जलसंपदामंत्री व नंतर विधान परिषदेचे सभापती असा मोठा राजकीय प्रवास हा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. राजकारणामध्ये पाऊल ठेवल्यापासून आजअखेर कधीही श्रीमंत रामराजे यांनी पराभव पाहिला नाही. आता येणार्या काळात श्रीमंत रामराजे यांनी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खुले आव्हान दिले आहे की, जर हिम्मत असेल लोकसभा निवडणूक समोरासमोर लढवा! मग, आपण कुणाची किती ताकद आहे ते पाहू. फलटण तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेले धोम-बलकवडी हे धरण बांधून आणि ते संपूर्ण पूर्णत्वास नेले. धोम-बलकवडी असो किंवा फलटण तालुक्याला लागणार्या पाण्याचे नियोजन असो, यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले काम फलटण तालुकाच नव्हे तर सातारा जिल्हाही कधी विसरू शकणार नाही. आता येणार्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे आता माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार का ? याकडे आता या मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे २०१९ साली माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज केले होते. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचा विश्वासू म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ओळख होती. पूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सक्रिय असणारे रणजितसिंह हे २०१९ साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून माढ्याचे तिकीट मिळविले आणि ते खासदार म्हणून सुद्धा निवडून आले.
माढा लोकसभा मतदारसंघ हा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्याला भेदत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योग्य ती रणनीती आखत ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांचा धडाका या मतदारसंघात लावला. गेल्या काही महिन्यांमध्ये तर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी हा या मतदारसंघात आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास प्राप्त केल्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आता परत लोकसभेची संधी भाजपा देणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, माजी खासदार व सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यावर मोठा प्रभाव आहे. त्यात माढा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेला माळशिरस हा माढा लोकसभा मतदारसंघात आहे. माळशिरस मतदारसंघ हा आरक्षित झाला असला तरीही त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांची ताकद ज्यांच्यामागे असते तोच तिथे निवडून येतो, ही परिस्थिती आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने राम सातपुते यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली व त्यांना माळशिरसमधून निवडूनसुद्धा आणले. यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठा हात आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयसिंह मोहिते पाटील व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जे संबंध आहेत ते संपूर्ण मतदारसंघाला ज्ञात आहेत. माळशिरस मतदारसंघात जरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जाहीर कार्यक्रम झाला तरी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील किंवा आमदार राम सातपुते यांची अनुपस्थिती दिसत आहे. त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीची लोकसभेची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली तर विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आमने-सामने आले तर ही निवडणूक नक्कीच रंगतदार होणार, त्यासोबतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाडल्या जाणार, यामध्ये कसलीही शंका नाही.